Home > Marathi > “रानफूल”- onkar Ekbote

“रानफूल”- onkar Ekbote

” तू बुद्धी दे तू प्रकाश दे नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे ”
                शाळेतली प्रार्थना चालू होती. आज १४ जून. शाळेचा पहिला दिवस. सारी शाळा आज उत्साहाचे संमेलन भरल्यासारखी वाटत होती.प्रार्थनेनंतर मुले वर्गात गेली. अजून सर यायचे होते. मुलांचा गोंधळ सुरु होता.जुने मित्र पुन्हा भेटल्याच्या आनंदात, नव्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यात मुले दंग होती.इतक्यात एक मुलगा वर्गात आला. पांढरा शर्ट,खादी pant आणि डोक्यावर गांधीटोपी असा त्याचा साधा वेष. त्याला पाहून वर्गातली टाय घातलेली, इस्त्रीचे कपडे घातलेली मुले हसू लागली. तो एका बाकाजवळ जाऊन दफ्तर ठेवणार इतक्यात किशोर कडाडला,”ए,ती माझी जागा आहे. तू माझ्याशेजारी बसायचं नाही. गावांढल ध्यान कुठलं!” हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर वर्गात आले. मुले उभी राहिली. ‘एक साथ नमस्ते’चा घोष झाल्यावर सरांनी सर्वांना बसायला सांगितले. ‘तो’सरांना म्हणाला,”मास्तर,मी कुटं बसू? मला हितं कुणी बसू द्येत न्हाईत” सरांच्या सारा प्रकार लक्षत आला. त्यांनी पहिल्या बाकावरच्या साहिलला त्याला जागा देण्यास सांगितले. “नाव काय तुझं?”सरांनी विचारले. “भैरव , भैरव मास्तर ” तो चाचरत बोलला. पुन्हा सगळा वर्ग हसू लागला. सरांनी सर्वांना शांत केले. सर म्हणाले,”छान नाव आहे तुझं. आणि आता इथे मास्तरांना ‘सर’ म्हणायचं. शहरातल्या नव्या पद्धती हळूहळू शिकून घे.”आणि सरांनी वर्गाची सुरुवात केली. किशोर आणि मयंक वर्गाचे ‘दादा’लोक होते. त्यातून scholarship मिळालेले दोघे हुशार. त्यामुळे वर्गात त्यांचा दबदबा असायचाच. दोघेही भैरववर हसत होते. कागदाचे बोळे करून त्याला मारत होते. भैरवला सारे समजत होते पण तो काही करू शकत नव्हता.       
               भैरवला त्याचे घर आठवले. घर कुठले, झोपडीच ती! वडील शेतमजूर म्हणून राबायचे; तर आई मोलकरीण म्हणून. त्याच्यानंतर दोन बहिणी घरात. दोन वेळच्या जेवणाची मारामार. तरीसुद्धा मुलाला शिकवण्यासाठी वाटेल तो त्रास सहन करणारे भैरवचे  वडील आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांसाठी  स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवणारी भैरवची आई आदर्शच होते.
                भैरव हळूहळू शाळेत रुळत होता. पण सेमी-इंग्लिशच्या भोवऱ्यात अडकत होता. गणित आणि शास्त्र हे विषय इंग्रज्रीत असल्याने त्याची म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. यथावकाश सहामाही परीक्षेचा निकाल जाहीर झाला. किशोर आणि मयंकला वर्गात सर्वात  जास्त गुण होते.आणि भैरवला अपेक्षेप्रमाणे गणित आणि शास्त्रात कमी गुण होते.शाळा सुटल्यावर किशोर आणि मयंकने भैरवला चिडवायला सुरुवात केली,” बागेत लावलं तरी रानफूल हे रानफूलच राहणार. त्याचा गुलाब कधीच होणार नाही. गुलाबाचा रंग, गंध याची जराही सर रानफुलाला येणार नाही.” भैरवला हे बोल चांगलेच लागले. एकतर कमी गुण मिळाल्याने तो आधीच दु:खी होता, त्यात किशोर व मयंकचे हे कडवट बोल ऐकून तो रडायलाच लागला. दोघे मात्र हसत निघून गेले.
                   काही दिवसांनी शाळेची सहल निघाली. भैरव अजूनही एकटाच होता. त्याला कोणीही आपल्यात सामावून घेत नव्हते. बस मध्येही तो एकटाच होता. त्याला राहून राहून घरच्यांची आठवण येत होती. सारे विद्यार्थी व शिक्षक कासारागावात पोहोचले. दिवसभर रानात भटकून, सौंदर्याचा आस्वाद घेऊन सारे परतले. जेवण झाल्यावर सारे शेकोटीजवळ बसले. किशोर व मयंक शेकोतीतली लाकडे घेऊन फिरत निघाले. भैरवचेतर त्यांनी ‘रानफूल’ नामकरणच केले होते. भैरव एकटाच बसला होता. किशोर व मयंक तिथल्याच एका पडक्या वाड्यात गेले. सुरक्षितता म्हणून त्यांनी हातात जळकी लाकडे घेतली होतीच. वाड्यात एका खोलीत जुने कपडे, रद्दी वगैरे सामान दिसले. अंधारात फिरताना दोघांना खूपच धाडसी असल्यासारखं वाटत होतं.
                    पण इतक्यात चुकून मयंकच्या हातातलं जळतं लाकूड त्या कपड्यांवर पडलं. आणि कपड्यांनी ,राद्दीने पेट घेतला. बघता बघता वाड्याच्या त्या भागाला आगीने वेढले. किशोर व मयंक “वाचवा,वाचवा”  असे ओरडू लागले. तो आरडाओरडा ऐकून सारी मुले धावत आली. शिक्षकांना काहीच माहीत नव्हते. ती प्रचंड आग पाहून मुले गर्भगळीत  झाली. पुढे जायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. पण न घाबरता भैरव पुढे आला आणि आत शिरला. मयंकचा  हात ओढून त्याला भैरवने वाड्याबाहेर ढकलून दिले. किशोर पर्यंत जाण्यासाठी मात्र भैरवला मार्ग मिळत नव्हता. अखेर कसेबसे त्याने किशोरला वाड्याबाहेर खेचले. किशोर बेशुद्ध झाला होता.
                     यथावकाश किशोर शुद्धीवर आला. भैरवने किशोर व मयंकचा जीव वाचवला होता. आता दोघेही पश्चात्तापाने पोळले होते. ते दोघे काही बोलणार इतक्यात भैरवच बोलला ,”अरं रानफुल हाय नव्हं मी . रानफुलाला वादळाची सवय असतीयाच. हा पन बागेतल्या गुलाबाला मातुर जोराच्या वाऱ्याची बी आदत नसतीया. रानफूल वाऱ्याफुड  झुकतया म्हणून  वारा बी त्याची पर्वा करतोय. पन गुलाबाचा ताठरपनाच  त्याच्या इनाशाला कारन होतोय.” किशोर व मयंकने भैरवची माफी मागितली. अखेर वाऱ्याच्या लयीबरोबर रानफूल डौलत होतं.
                        यथावकाश भैरवला या साहसाबद्दल बक्षीस मिळालं. सरकार तर्फे त्याच्या शिक्षणाची सोय झाली. किशोर व मयंक त्याचे चांगले मित्र  झाले.  त्यांच्या मदतीने भैरवने अभ्यासातही प्रगती केली. गुलाबाच्या सहवासाने रानफूल मोहरले होते. गुलाबाचे काटे आता टोचत नव्हते. कारण रानफुलालाही त्याचे अस्तित्व  मिळाले होते.

Onkar Ekbote

Categories: Marathi
  1. Madura
    November 12, 2011 at 10:40 pm

    छान जमलंय….!

    • Onkar Ekbote
      November 13, 2011 at 12:39 pm

      thanks!!!!!

  2. keshav shastri
    November 29, 2011 at 9:36 am

    ekadum chan, shabdarachana avadali mala…..

    • Onkar Ekbote
      October 17, 2012 at 2:46 pm

      thank u…..

  3. SANJAYTOPARPPE
    November 5, 2012 at 6:43 pm

    SHABBBASS RE MAZYA RANFULA TULA GULABACHE SOUNDRYA MILO

  4. Onkar Ekbote
    January 10, 2013 at 11:48 am

    dhayawad…..

  5. Onkar Ekbote
    January 10, 2013 at 11:50 am

    sorry… Dhanyawad…… !!!!

  1. No trackbacks yet.

Leave a reply to Onkar Ekbote Cancel reply